विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणे भरली, विसर्ग सुरू, मराठवाडा ओला चिंब, सांगली-कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर, नवजाला १८८ मि.मी.ची नोंद राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे.
विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व जिल्हे सरासरीच्या पुढे गेले आहेत. नागपूरसह गडचिरोलीत चौथ्या दिवशीही रिपरिप सुरूच होती. पर्ल कोटाचा नदीचा पूर ओसरला असला तरी चार मार्ग बंदच होते. भंडारा, गोंदियात संततधार असून तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १७ मार्ग बंद, पुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, सात महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातही दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाचे ५ दरवाजे प्रत्येकी ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले. आर्वी तालुक्यातील उमरी व दहेगाव गोंडी टक्के भरल्याने सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू आहे. अवकाळीने पिकांची हानी, २६ कोटींच्या निधीस मंजुरी.
सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधी मंजूर…
राज्यात फेब्रुवारी ते मे या काळात अवकाळीने ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार निधी मंजूर केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर विभागात ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर क्षेत्रासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागात १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख २७हजार, नाशिक विभागात १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टरसाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकणातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर क्षेत्रासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावतीच्या ५४ ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ १८९.८६ हेक्टर क्षेत्रासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० १९४ शेतकऱ्यांच्या २०७८३.१६ हेक्टरसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार मंजूर केले आहेत.
महाबळेश्वरला २२६ मिमी. पाऊस कोल्हापूर, सांगलीला पावसाचा रात्रभर तडाखा असून धरणांची पाणी पातळी वाढली आहे. साताऱ्यात नवजाला १८८ तर महाबळेश्वरला २२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जायकवाडीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता
पैठण : येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८० टक्केच्या वर गेल्याने धरणातून गोदावरी नदीपात्रात कधीही पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
याबाबत पत्र जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास १४ हजार ८०३ क्युसेकने धरणात पाणी होते. त्यामुळे धरणातील पाणी पातळी ८०.७२ टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. रात्रीतून पाण्याच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या पाच जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी रात्री जायकवाडी पाटबंधारे विभागाने पत्र पाठविले आहे. या पत्रात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षी जुलैच्या अखेरीसच धरणातील पाणीसाठा ८०% च्या वर गेला आहे. एक महिना अगोदर ८० टक्क्यांवर पाणी जायकवाडीत गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पाणीसाठा ८०% च्या वर होता. यावर्षी जुलैच्या अखेरीसच पाणीसाठा ८०% च्या वर गेला आहे. धरणात एकूण पाणीसाठा २४९०.४६२ दलघमी आहे. गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी एक महिना अगोदरच ८०% साठा आहे. यावर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दोन्ही हंगामासाठी पाणी पाळी मिळेल. सिंचनासाठी उजव्या कालव्यातून १ हजार ३०० क्युसेक तर डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाणी सोडले आहे. यावर्षीही धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर
शहरासह जिल्ह्याभरात शनिवारीही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा, गिरजा, खोपरी, धाण्ड, बोडखा नदी, निम नदी, आदी नद्यांना पूर आला आहे. कन्नड तालुक्यातील तपोवन प्रकल्प, गंधेश्वर प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. कन्नड, पैठण तालुक्यातील १० मंडळांत जोरदार पाऊस झाला आहे. हतनूर परिसरात चार तास जोरदार पाऊस झाल्याने शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात आवक वाढली. खुलताबादेतील बाजारसावंगी धाण्ड नदीला आलेल्या पुरामुळे बाजारसावंगी ते रेल धामणगाव हा मार्ग दुपारनंतर सहा तास बंद होता. आळंदचा पाझर तलाव शंभर टक्के भरला. नाचनवेल बसस्थानकाजवळील ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
नांदेडमध्ये झाला २५.७० मिमी पाऊस
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून शुक्रवारी २५.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला. बिलोली, कंधार, लोहा, मुदखेड आणि नायगाव या तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळपासूनही अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू होती.
लातूरमध्ये सलग तीन दिवसांपासून पाऊस
जिल्ह्यात शनिवारी तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरू असून, दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. मात्र, प्रकल्पांना जोरदार पावसाची आस कायम लागून आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १८५.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी येत आहेत.
ओढ्याला पूर; सहा गावांचा संपर्क तुटला हिंगोली:
जिल्ह्यात शनिवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. सेनगाव तालुक्यातील भंडारीजवळील ओढ्याला पूर आला. पुरामुळे त्यामुळे या मार्गावरील खैरी, खोलगिरा, बोरखेडी तांडा, हिवरखेडा, धोत्रासह परिसरात ६ गावांचा संपर्क तुटला. वसमत तालुक्यातील करंजाळा गावाशेजारून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला. हे पाणी करंजळा अर्ध्या गावात शिरले. शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ तालुक्यांसह कौठा, वारंगाफाटा, शिरडशहापूर, जवळा बाजार, डोंगरकडा, जवळा पांचाळ, नर्सी नामदेव, डिग्रस कहऱ्हाळे आदींसह सर्वदूर पाऊस सुरू आहे. शेतातील सखल भागात पाणी साचले होते.
बीडमध्ये २४ तासांत २० मिमी पाऊस
बीड जिल्ह्यात विविध भागांत शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर रात्री १२ नंतर सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर कायम असल्याचे चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत २० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.
बीड शहरात शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून रिमझिम पाऊस सुरू झाला. दुपारी थोड्या वेळ विश्रांतीनंतर पुन्हा ३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. सांयकाळी सुद्धा रिमझिम सुरूच होती. रात्री १२ नंतर पुन्हा सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कायम होता. पावसाची गती कमी-जात होत होती. मात्र, रिमझिम पाऊस सुरूच होता. बीड तालुक्यासह गेवराई, माजलगाव, धारूर, पाटोदा, आष्टी, परळी, शिरूर या तालुक्यांमध्ये शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. जून ते जुलै २६ पर्यंत १७८ मिमी पाऊस झाला आहे.
धाराशिवमध्ये ‘विश्वरूपा’ला पूर
जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या. या पावसामुळे शेत शिवारात पाणीच पाणी झाले आहे. भूम तालुक्यातील विश्वरूपा नदीला पूर आल्याने सावरगाव येथील पूल पाण्याखाली गेला होता. भूम-बार्शी मार्गावरील वाहतूक ठप्प होती. बेदरवाडी येथील दुधना नदीही दुथडी भरून वाहत आहे. बाणगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली. २ दिवसांनी सूर्यदर्शन नाही. जिल्ह्यात शनिवारी सकाळी १०:३० वाजेपर्यंत २७ मिमी पावसाची नोंद झाली.
परभणीत संततधार; नदीनाल्यांसह बंधारे खळाळले
परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यासह शुक्रवारीसुद्धा अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले, ओढे खळखळून वाहत आहेत; तर, जिल्ह्यातील बंधाऱ्यांमध्ये व नदीपात्रांत पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यातील विविध नदीनाल्यांना, ओढ्यांतून पाणी खळखळून वाहत आहे. सेलू तालुक्यातील हिस्सी, परभणी तालुक्यातील दैठणा, पोखर्णी, झरी, सोनपेठ तालुक्यातील शेळगाव, जिंतूर तालुक्यात बामणी, आडगाव बाजार, बोरी भागांत जोरदार पाऊस झाला.
दोन ठिकाणी पुलावरून पाणी चारठाणा परिसरातील गोदरी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. सेलू तालुक्यातील हिस्सी गुगळी-धामणगाव रस्त्यावरील खंडोबा ओढ्याला पूर आल्याने रस्ता काही वेळ बंद होता. दोन बंधाऱ्यांचे दरवाजे उघडले गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्नपातळी बंधाऱ्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. लघुपाटबंधारे विभागाने शनिवारी सकाळी एकूण चार दरवाजे उघडले आहेत. मुळी बंधाऱ्याखाली असलेल्या गंगाखेड शहरासह १४ गावांत गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे; तर पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यातून १७ हजार ६०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला आहे. गोदावरीचे पात्र तुडुंब भरल्याने ढालेगाव, मुदगल व तारुगव्हाण हे तिन्ही बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. ढालेगाव बंधाऱ्याचे २ दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला आहे.