छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : संगीत साधकांसाठी भारतीय संगीत कलापीठाच्या सुगम संगीत आणि वारकरी संगीत परीक्षेकरिता डिसें./जाने.-२०२५ सत्राचे अर्ज सोमवार, दि.१५/०७/२०२४ पासून सुरु करण्यात आलेले आहे. सदरील संगीत परीक्षेचा लाभ राज्यभरातील संगीत साधकांना मिळावा याकरिता कलापीठाचे जिल्हानिहाय अधिकृत परीक्षा केंद्र, संलग्नित संगीत संस्था व नोंदणीकृत संगीत शिक्षक परीक्षार्थींसाठी उपलब्ध आहे. सन २०१४ पासून महाराष्ट्राची प्राचीन व समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संगीतावर आधारित प्रथमा ते विशारद पर्यंत परीक्षा अभ्यासक्रम राबविणारी कलापीठ ही एकमेव आणि सर्वप्रथम संस्था आहे. कलापीठामार्फत राज्यभरातील संगीत साधकांसाठी सुगम संगीतावर आधारित देखील प्रथमा ते विशारद पर्यंत परीक्षा अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते. सदर परीक्षा देण्यासाठी वयाची कोणतीही अट नसल्याने राज्यभरातील अनेक संगीतप्रेमी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. सोमवार, दि.१२/०८/२०२४ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. महाराष्ट्र शासनमान्य असलेल्या भारतीय संगीत कलापीठाद्वारे शास्त्रीय संगीतासोबतच सुगम संगीत, वारकरी संगीत व संत साहित्य यावर संशोधन तसेच जतन आणि संवर्धनाचे विशेष कार्य निरंतर चालू आहे.
“अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त व शहीद जवानांच्या पाल्यांना कलापीठाची शिष्यवृत्ती”
भारतीय संगीत कलापीठामार्फत राज्यातील अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त व शहीद जवानांच्या पाल्यांना सुगम व वारकरी संगीताचे शिक्षण नि:शुल्क उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. सदर पाल्यांना या उपक्रमांतर्गत संगीत शिक्षणासोबतच कलापीठाच्या परीक्षेचे शुल्कही माफ करण्यात येणार आहे. यासाठी कलापीठ कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कलापीठामार्फत करण्यात आले आहे.
“राज्यातील संगीत विद्यालये आणि संस्थांना संलग्नीकरणाची संधी”
सुगम व वारकरी संगीताचा अभ्यासक्रम राबविण्यासाठी संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना ही मोठी संधी असून संस्था संलग्नता व अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यास ऑनलाईन अर्जही कलापीठामार्फत मागविण्यात आलेले आहे. शाळा, संगीत विद्यालये तसेच वारकरी शिक्षण संस्था यांच्यासाठी हे विशेष अभ्यासक्रम असून यासाठी ऑनलाईन अर्ज तसेच नियम व अटी कलापीठाच्या kalapith.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक संस्थांनी अर्ज करून या सांगेतिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही कलापीठामार्फत करण्यात आले आहे.
Thank you for info