अपडेटने केले आउटडेटेड : सिस्टम अपडेट केल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हरमध्ये बिघाड…!
मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बँका, एटीएम, रुग्णसेवेला मोठा फटका…!
एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प
शुक्रवार जगासाठी डोकेदुखीचा ठरला. ज्यांनी सकाळी कामाला सुरुवात केली, त्यांचे संगणक किंवा लॅपटॉप चालेनात, कोट्यवधी लोकांना अमेरिकेपासून फटका बसला. ऑस्ट्रेलियापर्यंत लोक त्रस्त झाले. जगभरातील विमान कंपन्या, बँका, रुग्णालये, टीव्ही प्रसारण तसेच अनेक कंपन्यांचे कामकाज अनेक तासांसाठी बंद पडले. अन् याचे कारण होते मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये निर्माण झालेला मोठा तांत्रिक बिघाड…
मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्यांचे संगणक अचानक कॅश झाले. स्क्रीन निळ्या रंगाची झाली. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असून, संगणक रिस्टार्ट करत आहोत, असा मेसेज झळकू लागला, सर्वांचे संगणक रिस्टार्ट व्हायला लागले. मात्र, त्यासाठी प्रचंड वेळ लागत होता.
विमान प्रवाशांचे प्रचंड हाल
विमाने जमिनीवरच राहिली:
भारतात अनेक विमानतळांवर चेक इन प्रक्रिया ठप्प पडली. इंडिगो, अकासा, एअर इंडिया एक्स्प्रेस तसेच स्पाइसजेटसह अनेक कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अमेरिकेत अनेक कंपन्यांनी सर्व उहाणे काही तासांसाठी रोखली. युरोपमधील विमान कंपन्यांनी विलंब होण्याची सूचना प्रवाशांना पाठविली.
‘हा सायबर हल्ला नाही: क्राउडस्ट्राइक’
ज्या क्राउडस्ट्राइकच्या अपडेटमुळे संगणक बंद पडले, त्या संस्थेने हा प्रकार सायबर हल्ल्याचा नाही, असे स्पष्ट केले. क्राउडस्ट्राइकचे सीईओ जॉर्ज कर्द्धा यांनी सांगितले की, हा सुरक्षेशी संबंधित किंवा सायबर अटॅक नाही. अपडेटमुळे झालेल्या बिघाडावर तोडगा काढण्यात आला असून, तो सोडविण्यात येत आहे.
‘या समस्येबाबत आम्हाला जाणीव असून ग्राहकांना तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य करून त्यांच्या यंत्रणा कार्यरत करण्यासाठी आम्ही काऊडस्ट्राइक तसेच उद्योगजगताच्या संपर्कात आहोत.’
– सत्या नडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट
‘ऑनलाइन पेमेंटवर परिणाम ऑनलाइन पेमेंट यंत्रणांवर परिणाम झाला. व्हिसा, एडीटी सिक्युरिटी, ॲमेझॉन व अमेरिकेच्या अनेक विमान सेवांवर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियात विमान कंपन्या, दूरसंचार सेवा पुरवठादार, बँकांमध्ये संगणक बंद पडले. त्यामुळे या सेवा बंद पडल्या.’
कुठे, कधी, काय?
सकाळी १०:००
क्राऊडस्ट्राइकची यंत्रणा ठप्प पडली.
सकाळी १०:४०
विमानतळांवरील सेवा विस्कळीत.
सकाळी १०:५०
दिल्ली विमानतळावर गेट स्क्रिन अचानक बंद. उड्डाणे रोखली.
दुपारी १:३०
ब्रिटनमध्ये स्काव न्यूजचे प्रसारण बंद.
दुपारी १:३७
ऑस्ट्रेलियात दूरसंचार सेवांवर परिणाम.
दुपारी २:१५
इंडियन कॉम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने तात्पुरता तोडगा सांगितला.
दुपारी ३
क्राऊडस्ट्राइक म्हणाले. सायबर हल्ला नाही. तोडगा शोधला आहे.
सायंकाळी ७:१५
अमेरिकन एअरलाईन्सची सेवा सुरु झाली.
सायंकाळी ७:३०
लंडन शेअर बाजाराचे व्यवहार सुरळीत.
मनातील प्रश्नांची उत्तरे : FAQ
नेमके काय झाले?
मायक्रोसॉफ्टने ‘क्राऊडस्ट्राइक’ या सायबर सिक्युरिटी प्लॅटफॉर्मची नवी अपडेट रिलीज केली. त्यातील फाल्कन सेन्सरमध्ये त्रुटी राहिली. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट अझ्युअर व मायक्रोसॉफ्ट ३६५ या सेवा बंद पडल्या. अड्युअर हा क्लाउड
कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. यातून विविध अप्लिकेशन तसेच सेवांचे व्यवस्थापन केले जाते. तेच बंद पडल्यामुळे फटका बसला.
किती काळ हीच स्थिती?
क्राउडस्ट्राइकने तोडगा दिला आहे. परंतु यंत्रणा पूर्ववत होण्यास बराच वेळ लागू शकतो. प्रत्येक संगणक स्वतंत्रपणे दुरुस्त करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक दिवस किंवा काही आठवडे लागू शकतात.
आव्हान काय?
बंद पडलेल्या संगणकांमध्ये सुधारित सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे त्रासदायक ठरू शकते. डेटा गमावण्याची भीती आहे. तो डेटा पुन्हा मिळविणे कठीण काम आहे.
दरम्यान १.९२ लाख कोटींचा फटका मायक्रोसॉफ्टला बसला आहे. कंपनीचे शेअर्स २.५ टक्के घसरले. तसेच १२ टक्क्यांनी क्राऊडस्ट्राईकचे समभाग कोसळले. १.३३ लाख कोटी रुपयांचा फटका यामुळे बसू शकतो.
पहिलं आयटी संकट; यातून नव्या मार्गदर्शक सूचना येतील
डिजिटल युग सुरू झाल्यानंतरचे हे पहिले आणि भयानक आयटी संकट आहे. हा सायबर अटॅक नाही. विमानतळांवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. बँका बंद, व्यवहार बंद, रुग्णालयांपासून ते रेल्वे, मेट्रोपर्यंत सगळं काही ठप्प झाले. फक्त त्याचे मोजमाप आत्ता लगेच करता येणार नाही आणि या संकटासाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. त्यामुळे नुकसानभरपाई द्यायची कोणी हादेखील प्रश्न आहे. त्यामुळे आता यावर उपाय म्हणून कदाचित नव्याने अशा संकटावेळी जबाबदारी निश्चितीपासून, नुकसान भरपाईपर्यंतच्या नव्या मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या जातील, असे वाटते.
भारत सरकारने केला मायक्रोसॉफ्टला संपर्क
• माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सांगितले की, या ग्लोबल आऊटेजबाबत मायक्रोसॉफ्टवर सहयोगी कंपन्यांना संपर्क केला आहे. समस्येचे कारण शोधण्यात आले असून, ती सोडविण्यासाठी नवे अपडेट्स रिलीज करण्यात येत आहेत.