अवघाचा संसार, सुखाचा करीन!
आनंदे भरीन, तिन्ही लोक !
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया!
अनंत तीर्थाचे माहेर असलेल्या भुवैकुंठ पंढरीत कटेवर हात ठेवून भक्तांच्या भेटीसाठी अतुर झालेल्या सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९४ व्या पालखी सोहळ्याने गुरूवारी भर पावसात पंढरीसाठी प्रस्थान केले. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष आणि टिपेला पोहोचलेला टाळमृदंगाचा गजराने अवघा आसमंत दणाणून गेला होता. सोहळ्यात सहभागी लाखो वारकऱ्यांचा जणू इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला होता. गुरुवारी पहाटे चारला झालेल्या घंटानादाने प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली.
‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दूधआरती करण्यात आली. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य वाढविण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुरुवारची नित्य नियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सातच्या सुमारास मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. यावेळी पावसाचे आगमन झाले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे रात्री नऊ वाजता ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर वीणा मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. चोपदारांचा आदेश होताच पालखी उचलण्यात आली. यावेळी ‘पुंडलिक वरदा’ चा एकच गजर झाला.
विश्वस्त अन् मानकरी सोहळ्यास जिल्हा न्यायाधीश तथा संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष महेंद्र के. महाजन, आमदार बाबाजी काळे, पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त अॅड. रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रांताधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, राजाभाऊ चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आदींसह मानकरी व सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्ताकडून माउलींच्या गाभाऱ्यास ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण:
श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरात परभणी येथील डॉ. श्रीराम मसलेकर व डॉ. पद्मजा मसलेकर या दाम्पत्याने ११ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा मुख्य गाभाऱ्यास अर्पण केला.
जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत. सेवाभावी वृत्तीने आरोग्य शिबिर घेत असताना सेवेकऱ्यांच्या निःस्वार्थ भावनेने भारावून गेलो. गाभाऱ्यात एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच हा दरवाजा अर्पण करण्याचा संकल्प केला, असे डॉ. मसलेकर म्हणाले.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीने गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास अलंकापुरीतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. यावेळी टाळ-मृदुंगाच्या निनादात हरीनामाचा गजर करीत वारकरी दंग झाले होते. माऊलींबरोबर पायी पंढरपूर गाठण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वैष्णवांनी अलंकापुरी गजबजली आहे.
‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, या अभंगाची अनुभूती देत श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास देहूकरांनी गुरुवारी सकाळी भावपूर्ण निरोप दिला. वरुणराजाच्या अभिषेकात आणि हरिनामाच्या गजरात हा सोहळा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आला. शहरातील आकुर्डी परिसरात मुक्काम करून शुक्रवारी सकाळी तो पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.
देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून सकाळी तुकोबारायांचा पालखी सोहळा आषाढी वारीची वाट चालू लागला. तत्पूर्वी इनामदार वाड्यामध्ये देहू देवस्थान आणि शासनाच्यावतीने महापूजा करण्यात आली. पहिली अभंग आरती अनगड शहावली बाबा दर्गा येथे झाली. त्यानंतर देहूच्या वेशीवर पालखी फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आली.
सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असता तरी वारकऱ्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. रेनकोट, छत्री घेऊन वारकरी चालत आहेत. चिंचोली येथे दुपारचा विसावा झाला. त्यानंतर देहूरोडमार्गे पालखी सोहळा सायंकाळी पिंपरी-चिंचवडच्या सीमेवर पोहोचला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकामध्ये सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पालखीचा रथ आला. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्वागत केले. यावेळी आमदार महेश लांडगे, उमा खापरे व अमित गोरखे उपस्थित होते.
वरकऱ्यांचा अपूर्व उत्साह:
सकाळपासूनच जोरदार पाऊस शहरामध्ये ठिकठिकाणी येत आहे. भरपावसातही वारकऱ्यांचा उत्साह दिसत होता. भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाखाली भाविक सोहळा अनुभवत होते. तेथे काही काळ पालखीने विसावा घेतल्यानंतर सायंकाळी हा सोहळा आकुर्डी येथे विसावला.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा:
वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओड लागली असून आषाडी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी गजबजली आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच पंढरपूरकडे मुख्यमंत्री फडनविसांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले आहे संपूर्ण देहूमध्ये भक्तिमय वातावरण झालेला आहे. देहू नगरी आहे त्या संपूर्ण वारकऱ्यांनी जे आहे ती फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते देहूतील प्रत्येक रस्ता जो आहे तो आता वारकऱ्यांने फुलून गेलेला पाहायला मिळते आपण पाहू शकतो की हे हा देहूचा जो आहे तो मुख्य मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावर वारकऱ्यांची मांदी आळी आहे ते आता या ठिकाणी जमू लागली आहे. संत तुकाराम महाराजांच्या च्या पालखीच प्रस्थान जे आहे ते आता पंढरपूरकडे होईल. पहिला मुक्काम जो आहे तो शेजारीच असलेल्या इनामदार वाड्यामध्ये हा त्या ठिकाणी असणार आहे.
गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार:
राज्यभरातील वारेकऱ्यांचे लक्ष लागलेल्या आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान आहे. लाखो वारकरी या भक्तिपूर्ण सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गर्दीच्या नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. वारकऱ्यांची नोंद, वाहनांची संख्या आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलीस एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. पुणे पोलिसांकडून एआय ची व्यवस्था विश्रांतवाडी संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवेघाट या प्रमुख ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल.