चार वर्षांचे नाते संपुष्टात : नताशासोबत घटस्फोट, खुद्द हार्दिकने केले शिक्कामोर्तब
टी-२० विश्वविजेतेपदाचा ‘हिरो’ ठरलेल्या हार्दिक पांड्याचे खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. पत्नी नताशा स्टॅनकोविकने मध्यंतरी लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. गुरुवारी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहीत चर्चावर शिक्कामोर्तब केले आहे. हार्दिक व नताशाने चार वर्षांनी आपले नाते संपवले आहे.
हार्दिकने सर्बियातील मॉडेल असलेल्या नताशासोबत ३१ मे २०२० ला विवाहगाठ बांधली होती. या जोडप्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र वर्षभरातच पांड्या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यंदाच्या आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता मात्र त्यावेळेससुद्धा नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यादरम्यान तिने आपल्या इन्स्टाग्रामच्या नावातून पांड्या हे आडनावसुद्धा काढून टाकले होते. काही दिवसांनी नताशाने आपले व हार्दिकचे लग्नाचे फोटो अकाउंटवरून डिलीट केले होते, हे फोटो तिने नंतर रिस्टोअर केल्यावर कदाचित हार्दिकवर होणाऱ्या टीकांवरून लक्ष हटवण्यासाठी तिने असे केलं असावे असाही अंदाज वर्तविण्यात आला होता.
टी-२० विश्वविजयाच्या जल्लोषात नताशाने हार्दिकसह सहभाग घेतला नाही. तिने एकदाही हार्दिकला अभिनंदन करणारी किंवा त्याचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली नव्हती. हार्दिकनेसुद्धा मुंबईत परतल्यावर केवळ आपला मुलगा अगस्त्यसह सेलिब्रेशन करून फोटो शेअर केले होते. त्यातही नताशा दिसली नव्हती. राधिका व अनंत अंबानीच्या लग्नातसुद्धा हार्दिक हा मोठा भाऊ कृणालबरोबर दिसला होता. अंबानींच्या कार्यक्रमात हार्दिकने अनन्या पांडेसह जोरदार डान्स केला.
हार्दिकने पोस्टमध्ये लिहिले की, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर अखेरीस मी आणि नताशाने या नात्याला विराम देण्याचे ठरवले आहे. एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेण्याआधी आम्ही हे नाते वाचविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण आता वाटतेय की हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आमच्या कुटुंबात आम्ही एकत्र अनुभवलेला आनंद व एकमेकांबद्दलचा आदर कायम स्मरणात असेल त्यामुळेच हा निर्णय घेणे कठीण होते. आम्हाला अगस्त्यच्या रूपात आशीर्वादच मिळाला आहे, त्यामुळे त्याचे हित हे आम्हा दोघांच्या आयुष्यात केंद्रस्थानी असेल, त्याच्या आनंदासाठी आम्ही पालक म्हणून जे काही करू शकतो ते सर्व करू, या कठीण व संवेदनशील वेळी आमच्या खासगी आयुष्याचा आदर राखावा ही विनंती. आपल्याकडून यावेळी पाठिंबा, समजूतदारी व प्रेमाची आम्ही अपेक्षा करतो.’
-हार्दिक व नताशा