शेतात काय पेरायचं, कधी विकायचं; शेतकऱ्यांना सांगणार “महाविस्तार ॲप”..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

शेतकऱ्यांचा डिजिटल मार्गदर्शक : ॲपद्वारे मिळणार विविध शासकीय योजनांची माहिती:

राज्य सरकारच्या कृषी विभागाने ‘महाविस्तार ॲप’ नामक ‘एआय’ ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीपासून तर पीक, बियाणे व इतर कृषी निविष्ठांची योग्य निवड, पिकांची मशागत, कीड, रोग, खत, पाणी यांचे व्यवस्थापन, विविध बाजारपेठांमधील शेतमालाचे दर, त्यातील चढ-उतार, हवामान बदल या मूलभूत बाबींसह शेतीविषयक विविध शासकीय योजनांची माहिती या ॲपमधील एका ‘क्लिक’वर मिळणार असल्याने हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शक ठरणार आहे.

अलीकडे सोशल मीडियावर शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही पोस्टमुळे शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे. अलीकडे प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर वाढत चालला असून, त्याचा शेती क्षेत्रातही वापर केला जात आहे. शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक नुकसान टळावे, यासाठी कृषी विभागाने महाविस्तार नावाचे ॲप विकसित केले असून, ते शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू करण्यात आले आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना हवी असलेली शेती संदर्भात बहुतांश माहिती समाविष्ट केली असून, शेतकऱ्यांनी ॲपमधील चॅटबॉटच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या घरबसल्या सहज सोडविता येणार आहे.

काय आहे महाविस्तार ॲप?

महाविस्तार ॲप हे स्मार्ट फोनमध्ये डाउनलोड अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या पूर्वमशागतीपासून तर बाजारपेठेपर्यंत आणि कृषी निविष्ठांच्या खरेदी, वापरापासून तर शेतीविषयक तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारच्या कृषी विभागाने हे ॲप विकसित केले आहे.

पेरणीपासून शेतमाल विक्रीपर्यंतचा सल्ला:

या ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कोणते पीक घ्यावे, त्यासाठी कोणती बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांची निवड करावी, पिकाच्या कोणत्या टप्प्यात कोणती खते द्यावी. कोणत्या रोग व किडीवर कोणत्या कीटकनाशक, बुरशीनाशक व सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी, पिकाची कापणी व शेतमालाची साठवणूक कधी व कशी करायची, विविध बाजारपेठांमधील शेतमालाचे दर आणि विक्रीची योग्य वेळ यासह अन्या बाबींची माहिती या ॲपद्वारे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध करून दिली जाते.

विविध शासकीय योजनांचीही माहिती:

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतीविषयक विविध योजना राबविते. या सर्व योजनांची संपूर्ण माहिती, अटी, निकष, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्यावर मिळणारे अनुदान, अर्ज सादर करण्याची पद्धती व प्रक्रिया यासह पीएम किसान, पीक व फळपीक विम्याची माहिती या ॲपवर सहज पाहता येते.

फवारणी, खत, हवामानाचा अंदाज:

चांगल्या उत्पादनासाठी पिकांचे योग्य संगोपन व मशागत करणे अनिवार्य आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीकनिहाय खत व पाण्याचे व्यवस्थापन, खत व फवारणी औषधांच्या मात्रा व वापराच्या पद्धतीसह त्यांचे वेळापत्रक तसेच पावसाची शक्यता व हवामानाचा अंदाज याचीही माहिती या ॲपवर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते.

मला प्रश्न विचारा : चॅटबॉट देणार माहिती:

या ॲपमध्ये ‘आस्क मी’ किंवा ‘मला प्रश्न विचारा’ या नावाचा एआय चॅटबॉट आहे. या चॅटबॉटवर जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर सहज व शास्त्रीय उपाय लगेच मिळविता येतात. यासाठी शेतकऱ्यांना त्या चॅटबॉटवर त्यांचे प्रश्न अथवा समस्या व्यवस्थित लिहायच्या आहेत.

ॲपमध्ये ‘फार्मर आयडी’ टाकून करा लॉगिन:

महाविस्तार ॲप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यात स्वतःचा फार्मर आयडी टाकून लॉगिन करावे लागते. आयडी जोडल्यावर शेतकऱ्याची शेतजमीन, भौगोलिक स्थिती, मागील हंगामांची माहिती आणि घेतलेली पिके ॲप आपोआप ओळखते.

शेतकऱ्यांना महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतीसंबंधीची सर्व प्रकारची माहिती तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. शेतकऱ्यांनी या ॲपमधील माहितीवर अंमलबजावणी करणे व सुविधांचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *