इस्राइल-इराणच्या युद्धाचा सामान्य जनतेवर होणार परिणाम..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

इराणने इस्रायलमधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर वळणांवर पोहोचत असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. सोमवारी संध्याकाळी इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हवाई हल्ला केला. इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर बॉम्ब टाकले. हल्ल्याच्या वेळी एक महिला अँकर लाइव्ह शो करत होती. सुदैवाने ती या हल्ल्यात बचावली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये अँकरला स्टुडिओतून पळताना दिसते.

पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनी इस्रायल विजयाच्या मार्गावर असल्याचे नमूद करून तेहरानच्या हवाई क्षेत्रावर इस्रायलचे नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. इराणकडून आण्विक व क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने इस्रायलची आगेकूच सुरू असल्याचा दावा संरक्षण मंत्री काट्झ आणि लष्करप्रमुख जमीर यांनी केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला असून, ते जी-७ शिखर परिषदेत म्हणाले की, इराण हे युद्ध जिंकणार नाही. खूप उशीर होण्यापूर्वी इराणी सरकारने वाटाघाटी कराव्यात. यादरम्यान, इराणशी लागून असलेल्या सीमा पाकिस्तानने बंद केल्या आहेत. (वृत्तसंस्था)अमेरिकी दूतावास इमारतीचे नुकसान तेल अवीवमधील अमेरिकी दूतावासाच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झाल्याचे अमेरिकी राजदूत माईक हकाबी यांनी सांगितले. या हल्ल्यांत कोणीही जखमी झाले नसल्याचे हकाबी म्हणाले.

भारतीयांनो सतर्क राहा:

इराण-इस्रायल पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी म्हटले की, इराणमधील भारतीय दूतावास तेथील स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यांच्या संपर्कात आहोत. काही भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधील अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्थादेखील दूतावासाने केली.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याच्या स्थितीत इराणममधील सर्व भारतीयांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, भारतीय दूतावासाच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवावे आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

युद्धाच्या भडक्याने पेट्रोल महागणार?

कच्च्या तेलाच्या दरात १० टक्क्यांनी वाढ : शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या हातात दिला भोपळा.

इस्रायलने इराणमधील अणू ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत एका दिवसात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० मे २०२५ रोजी कच्च्या तेलाचे दर ६२ डॉलर प्रतिबॅरल इतक्या खाली घसरले होते. मात्र, यात वाढ होत ते ७८ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराने गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना शून्य टक्के रिटर्न्स दिले आहेत.

इराण जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे. शिवाय इराणचे भौगोलिक स्थानही अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ ही एक जलवाहतूक मार्गिका आहे, जिथून सौदी अरेबिया, कुवेत, इराक यासारख्या देशांचा तेल पुरवठा होतो. जर इराणने हा मार्ग बंद केला, तर जगातील सुमारे २० टक्के तेल पुरवठा थांबू शकतो. यामुळे तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

तेलाच्या किमती वाढतील?

युद्धामुळे जगभरात अस्थिरता वाढली असल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला असून, कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र ओपेक देशांनी उत्पादन वाढविल्यास ही वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल?

कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत केल्या तर तेल विक्री कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवाव्या लागतील. यामुळे वाहतूक, अन्नपदार्थ आणि इतर वस्तू महाग होऊ शकतात. जर युद्ध दीर्घकाळ चालले तर महागाई आणखी वाढेल. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचेही नुकसान होत आहे. तेलाच्या किमती वाढल्याने भारतासारख्या २० टक्के तेल आयात करणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतो.

तेहरान सोडा : इस्रायल

इस्रायलच्या लष्कराने इराणची राजधानी तेहरानमधील लोकांना वस्त्या सोडून जा, असा इशारा दिला आहे. या शहरातील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जातील, असे लष्कराने बजावले. तेहरानमध्ये अनेक भागांत स्फोट झाले आहेत. इराण व इस्रायलमधील संघर्षांत दोन्ही बाजुंनी क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. इराणने इस्रायलमधील तेल अवीव शहराला टार्गेट करत हल्ले केल्याने येथे अनेक स्फोटांचे आवाज येत आगीचे लोळ बाहेर पडत आहेत. इराणकडून तेल अवीव येथे सतत हल्ले होत असल्याने नागरिक पार्किंग गॅरेजमध्ये आश्रय घेत आहेत. यावेळी एक महिला बाळाला पोर्टेबल पंख्याने हवा घालताना दिसत आहे.

इराणमध्ये आण्विक केंद्रात किरणोत्सर्जन:

आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे संचालक जनरल राफेल मारियानो ग्रॉसी यांनी इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणचे मुख्य आण्विक केंद्र असलेल्या नतांज प्रकल्पात रेडिओलॉजिकल तसेच रासायनिक किरणोत्सर्जन झाल्याची शंका व्यक्त केली आहे. मारियानो यांच्यानुसार सध्या नतांज भागात किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आहे. अजून तरी याचा नागरी वस्त्या किंवा पर्यावरणावर परिणाम झालेला नाही.

इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचे हवाई हल्ले:

हल्ल्यात इराणच्या दोन प्रमुख लष्करी अधिकाऱ्यांचा झाला मृत्यू इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर जोरदार हवाई हल्ले केले. इराणच्या अणुउर्जा कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे आणि क्षेपणास्त्र केंद्रांवर निशाणा साधण्यात आला. युक्रेनने ज्याप्रमाणे मॉस्को परिसरात हेर पेरून, त्या ठिकाणची गोपनीय माहिती मिळवून पूर्वतयारीनिशी काही दिवसांपूर्वी हल्ले केले होते, तशीच तयारी इराणवर हल्ला करताना इस्रायलने केल्याचे सांगण्यात येते.

या हल्ल्यात इराणच्या पॅरामिलिटरी रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख जनरल हुसेन सलामी आणि सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ जनरल मोहम्मद बाघेरी हे ठार झाले आहेत. इराणवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. इराणमधील नतांझ येथील अणुविकास केंद्रासह अनेक ठिकाणांवर इस्रायलने हल्ले केले. दरम्यान, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

नेतान्याहूंचा मोदींना फोन:

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल रात्रीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जर्मनचे चॅन्सलर, फ्रान्सचे राष्ट्रपती यांच्यासह जगातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. तसेच, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी देखील चर्चा करणार आहेत.

इस्रायलच्या अस्तित्वासाठी केला इराणवर हल्ला:

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलच्या अस्तित्वासाठी आम्ही लढत असून, त्याचसाठी ही कारवाई केली आहे. इराण अण्वस्त्रे तयार करण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे आमच्यापुढील धोका आणखी वाढला आहे. हे संकट दूर करण्यासाठी आवश्यक तितका काळ हा लढा सुरू ठेवू इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांनी आम्ही इस्रायलला अतिशय कठोर शिक्षा करू, असा इशारा दिला आहे. इस्रायलने इराणमधील निवासी वस्त्यांवर देखील हल्ले केले, असा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *