डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठीच नाही, तर त्यावर मोफत अपघाती विमा संरक्षण देखील मिळू शकते. अनेकांना याची माहिती नसते. त्यामुळे आपल्या कार्डचा प्रकार आणि विमा संरक्षण किती आहे हे एकदा बँकेत चौकशी करून निश्चित करा. योग्य वेळी ही माहिती आपल्या कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरू शकते.
आपल्यापैकी बहुतेक जण आपले डेबिट कार्ड फक्त एटीएम मधून पैसे काढण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी वापरतात. पण तुमच्या खिशात असलेल्या डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा विमा मिळतो असं कोणी जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नेमका हा विमा काय आणि कोणत्या बँका तो देतात? क्लेम कसा करता येतो त्याबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊयात.
कोणत्या बँका देतात मोफत विमा?
कोणत्या बँका देतात मोफत विमा. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या अनेक प्रमुख भारतीय बँका त्यांच्या डेबिट कार्डवर मोफत विमा देतात. हा विमा सामान्यतः ग्रुप पॉलिसीचा भाग म्हणून समाविष्ट केला जातो. त्यामुळे वेगळा पॉलिसी क्रमांक जारी केला जात नाही. देण्यात येणाऱ्या या कव्रमध्ये वैयक्तिक अपघात, विमान अपघात, खरेदी संरक्षण आणि कार्डची फसवणूक यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.
मोफत विमा कव्रेज साठी नियम, अटी:
मोफत विमा कव्रेज साठी नियम अन अटी बँकांकडून डेबिट कार्डवर लागू असलेल्या मोफत विमा कव्रेज साठी काही नियम आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ज्यात सर्वात पहिले म्हणजे तुमचे डेबिट कार्ड सक्रिय असेल तरच हा विमा लागू होतो. याचा अर्थ काय? तर ठरवून दिलेल्या कालावधीत डेबिट कार्ड वापरून ट्रानजॅक्शन पूर्ण होणं गरजेच आहे. उदाहरणार्थ काही बँकांच्या नियमानुसार 60 किंवा 90 दिवसात किमान एक किंवा काही विशिष्ट खरेदी किंवा ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक असते. ठरवून दिलेल्या कालावधीत व्यवहार झाला तरच हे विमा कवर लागू होते अन्यथा नाही.
डेबिट कार्ड कसे ठेवाल सक्रिय?
डेबिट कार्ड कसे ठेवाल सक्रिय? आज ऑनलाईन पेमेंटमुळे अनेक जण डेबिट कार्ड वापरत नाही पण खिशातील डेबिट कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही वीज बिल, मोबाईल रिचार्ज किंवा पेट्रोल सारख्या दैनंदिन खर्चाचे पैसे देऊ शकता. यामुळे आवश्यक व्यवहार पूर्ण करण्याची अटही पूर्ण होईल आणि विमा कव्रेजही मिळू शकेल.
विमा संरक्षणाची रक्कम किती?
विमा संरक्षणाची रक्कम किती? बँकांकडून डेबिट कार्डवर देण्यात येणारी विम्याची रक्कम ही तुमच्या कार्ड श्रेणीवर अवलंबून असते. सर्वसामान्य म्हणजेच रेगुलर डेबिट कार्डवर साधारण एक लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते तर प्लॅटिनम किंवा प्रीमियम कार्डवर दोन ते पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. काही प्रीमियम कार्डवर ही रक्कम 10 लाखांपर्यंत असू शकते.
क्लेम कसा करावा?
आता पाहूयात क्लेम कसा करावा? जर कार्डधारकाचा अपघात झाला तर नॉमिनी असलेल्या व्यक्तीने ठरवून दिलेल्या वेळेत बँकेला याबाबत कल्पना देणे आवश्यक आहे. सामान्यतः 30 ते 60 दिवसांच्या आत दावा दाखल करणे अनिवार्य मानले जाते. यासाठी क्लेम फॉर्म गरजेचा आहे. अपघातात मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अपघात झाल्यास एफआयआर आणि नॉमिनीचे केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. तसेच डेबिट कार्ड सक्रिय आहे यासाठी बँक स्टेटमेंट देखील कधी कधी मागितले जाऊ शकते.



